भाळीच्या ग रेषा बाई खोल खोल उमटल्या
सुखा दुःखाच्या ग लाटा त्यांनी कितीक झेलल्या
काया झिजली झिजली उन्हा पावसाचा मारा
वर्षे आली वर्षे गेली.. विसावा ही नाही जरा
चांदी आली डोईवरी,अनुभव जगण्याचा
भोगलेल्या जन्माचा ग असा थांग लागायाचा
त्वचा रापली रापली जणू भट्टीतले सोने
लागे कस लढण्याचा दिस मास होती उणे
तुझी नजर करारी सोसलेली, जाणलेली
आयुष्याला भिडे थेट, पापणी न लवलेली
मिटलेल्या ओठांमागे किती कहाण्या दडल्या
निग्रहाने नियतीला अशा सामोऱ्या ग गेल्या
- वृंदा टिळक.
एका अप्रतिम चित्राने आमंत्रण दिले शब्दांना आणि सुरांना!

No comments:
Post a Comment