Sunday, 27 February 2022

सार्थ

सार्थ

उनाड व्हावे शब्दांनीही
सैल सोडूनी लगाम सगळे
विहरत जावे इथे तिथे अन्
शोषून घ्यावे रंग वेगळे

हळू हळू मग नभामधले
उतरेल चांदणे शब्दांवरती
उजळत जातील कडे कपारी
चमकत राहील चांदण कांती

सोडून मग तेजाची उजळण
गुहा बघावी गर्द अंधारी
सघन गडदशी दुःखाची उधळण
मुरवून घ्यावी खोल अंतरी

तिथूनी दिसावा एक झरोका
अंधार भुयारी ठेचकाळता
दुरातूनी यावी किरण शलाका
अर्थांतरी शब्दाने धडपडता

यावी सागरा उधाण भरती
भाव अंतरी चिंब मुरावा
असा अनोखा शब्द लाभता
सार्थ कवीचा जन्मच व्हावा

वृंदा टिळक
दिनांक 27 फेब्रुवारी 2022


No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...