काही मनातले
अगदी पहाटे पहाटे समुद्रावर जाता येण्याजोगे सुख नाही. दिशा उजळू लागलेल्या असतात. त्या मंद मवाळ प्रकाशात समुद्र देखील वेगळाच दिसतो. खरे तर समुद्राला काय अंधार उजेडाचे कौतुक? त्याची भरती ओहोटी तर अव्याहत चालूच असते. बदललेली असते ती आपली दृष्टी. रात्रीच्या विश्रांती नंतर ताजे झालेले मन.
अशा पहाटेच्या प्रकाशात समुद्राकडे बघताना मला नेहमी शांत झोपलेल्या बाळांची आठवण येते. कोवळे, निरागस असे काहीसे समुद्राचे रूप वाटते.
समुद्रावर त्यावेळी फारशी गर्दी नसते. काही तुरळक फिरायला येणारे, दोन चार जण पाण्यात डुंबत असलेले, एखादं कोणी सर्फिंग करणारं, कोणी नाऱ्यावर डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला. इतकाच मोजका मानवी वावर.
आजची सकाळ देखील मला अशीच लाभली. स्वच्छ समुद्रकिनारा. शांतता ..प्रसन्नता. इथे सध्या दिवसातले काही प्रहरच असणारी सुखशीतल हवा.
ओहोटी असावी बहुतेक. नुकत्याच लाटा येऊन गेल्याने नितळ झालेला किनारा. त्यात आपल्या पायांचे खोल ठसे उमटू न देता अलगद चालण्याचा माझा प्रयत्न बराचसा यशस्वी होत होता. समुद्राकडे बघत चालणे असा काही ध्यानाचा प्रकार आहे की नाही माहिती नाही. पण मनातले विचार, त्यांची गती, त्यांचा कोलाहल अशावेळी निवळत शांत होत जातात.
थोड्या वेळाने सूर्य वर आला. त्याचे किरण ढगांवर पडू लागले. ढगांच्या छटा देखील बदलल्यासारख्या भासत होत्या आणि तो विलक्षण चमत्कार घडला. आधी ढगांच्या मध्ये प्रकाशाचा नुसता गोल दिसत होता. त्यानंतर त्याच्यात रंग दिसू लागले आणि पाहता पाहता तिथे इंद्रधनुष्य उमटले. अगदी लहान..खरे तर सूर्यकिरणांच्या विशिष्ट कोनाचीच ती जादू!
ते इवलेसे इंद्रधनुष्य आकाशातून जणू समुद्राच्या पाण्यात डोकावत होते आणि तिथून शतगुणीत होऊन माझ्या मनात!
अनपेक्षितपणे इंद्रधनुष्याचे उमटणे, त्याच वेळेला माझे लक्ष तिकडे जाणे आणि इंद्रधनुष्य मला दिसणे हा माझा आणखी एक' हे माझ्यास्तव क्षण '. अशा या ' हे माझ्यास्तव ' क्षणांनी तर आयुष्य सुंदर होते. फक्त त्या त्यावेळी तो क्षण जाणवला मात्र पाहिजे.
अजून नाही जागी राधा
अजून नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतीरावर
आज घुमे का पावा मंजुळ
मावळतीवर चंद्र केशरी
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती
तिथेच टाकुन अपुले तनमन
विश्वच अवघे ओठां लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधले थेंब सुखाचे
“हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव”
- इंदिरा संत.

No comments:
Post a Comment