नेऊरगावची दिवाळी
गोदावरीच्या काठावर वसलेले आमचे गाव अगदी लहान, जेमतेम हजार लोकवस्तीचे होते. मोजकीच पक्की घरे असलेल्या त्या गावात आमचा प्रचंड मोठा वाडा होता. माझ्या पणजोबांनी पेशव्यांच्या सरदाराकडून तो विकत घेतला होता असे म्हणतात. त्या वाड्यात साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचे हे वर्णन.
दिवाळी जवळ आली की हवेलाच दिवाळीचा वास यायला लागायचा. आईने भाजणी, रवा बेसन भाजायला घेतलेले असायचे. मोलकरीण घर सारवायला घ्यायची. एकेक खोली सारवून वाळली की तशीच कोरी ठेवायची नाही म्हणून त्यावर रांगोळी काढायला मिळायची.
आम्ही लहान मुलं टिकल्यांच्या डब्यातून एकेक टिकली उडवण्यात मग्न असायचो. कोणाकडे समजा पिस्तूल आणि टिकल्यांचा रोल असेल तर मग रुबाब काय विचारता ??!!!
साधारण त्याच दिवसांत बहुरूपी येत असत. गावोगाव फिरून, अनेकविध सोंगे उत्तम वठवून ते धान्य, पैसे जमवायचे. मला आठवते, एके वर्षी बहुरुपी पोलिसांचे हुबेहूब सोंग घेऊन. बाबांना पकडायला आले होते. माझी तर घाबरगुंडीच उडाली होती. गावाचे आदरस्थान असलेल्या बाबांचे नाव घेतले की आपोआप सगळा गाव जमा होणारच हे त्यांनी अचूक जाणले होते .
एकादशीच्याही आधी कुंभारीण बाई येत असत. त्या पणत्या, फडे* देत.त्या फड्यांवर पाणी व हळदकुंकू वाहून पूजा केली जायची. कुंभारीण बाईना हळदकुंकू, खण, शिधा द्यायची प्रथा होती. पणत्या पाण्यात काही तास बुडवून, नंतर उन्हात वाळवत असत. पणतीत घालायला सरकीचे तेल तेल्याकडून आलेले असायचे. कासार येउन बांगड्या भरून जायचा. हातावर मेंदी तर असायचीच!
दिवाळी वसुबारसेपासूनच सुरु व्हायची. नरकचतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नानाचे वेळी बाबांना तेल मालिश करायला गावचा न्हावी यायचा आणि मग जाताना शिधा आणि दिवाळी घेऊन जायचा. रोजचे पंचांग सांगायला सकाळी गुरुजी येउन जायचे. आता लक्षात येते आहे की, गावगाड्याची कामे बलुतेदारांनी करायची प्रथा जरी काळाच्या ओघात बंद झालेली असली तरी परस्पर स्नेह, आदर आणि जबाबदारीचे भान अजून टिकून होते.
अभ्यंग स्नानाचे वेळी दिवाळीचे फटाके पहिल्यांदा उडवता यायचे. नंतर सुवासिक तेलाच्या आणि मोती चंदन साबणाच्या वासाच्या थंडीतून गावातल्या रामाच्या मठात काकड आरतीला जायचो. मठात सगळ्यांनी मिळून काकडारती केली की मगच राम उठणार आहे असे त्या बालवयात खरोखरीच वाटायचे.
दिवाळीतला सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. अंगणभर दुपारपासून खपून अनेक रांगोळ्या काढलेल्या असायच्या. आता आपल्या घरांतून बैठकीची एक खोली असते. आमच्या वाड्यातली बैठकच एका घराएवढी होती. तीन पातळ्यांवर ती सजवलेली होती. पिळाचे नक्षीदार लाकडी खांब आणि कठडे त्या बैठकीतले निरनिराळे भाग अधोरेखित करायचे. मुख्य भाग गाद्या, लोड तक्के, गालीच्यानी सुशोभित होता. छतावर लटकणारी मोठाली झुंबरे, भिंतीवरचे नक्षीदार चौकटीतले आरसे, तंजावर शैलीतील चित्रे, आजीआजोबा आणि पणजोबांचे फोटो हे सगळेच बैठकीला एक खास व्यक्तीमत्व देऊन जायचे.
लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी चौरंगावर चांदीच्या ताटात नाणी, आजीची वज्रटीक आणि नथ मांडलेली असायची. शेजारी घडवंचीवर पेट्रोमक्सबत्ती असायची. बाकी भागात कंदील आणि शेकडो पणत्यांनी वाडा उजळत असे. षोडशोपचार पुजेची तयारी आईने बैठकीत करून ठेवलेली असायची. माझे बाबा फेटा, रेशमी सदरा घालून गुरुजींची वाट पहात असायचे. जगातला सगळ्यात रुबाबदार व देखणा पुरुष कोण असेल तर ते माझे बाबा आणि जगातली सर्वात सुंदर स्त्री म्हणजे माझी आई हे त्या दिवशी पुन्हा एकदा जाणवून जायचे!
गुरुजी आणि वाजंत्रीवाले हे दोन घटक वेळ न पाळून बाबांच्या रागाचे कारण बनायचे. आम्ही नवे कपडे घालून, केसात शेवंतीच्या, कलाबूती वेण्या माळून आतबाहेर करत असायचो.
मग एकदम सगळेच जोरात सुरु व्हायचे. वाड्याच्या बाहेर पूर्ण बॅण्ड पथक, बैठकीत पूजा सांगत असलेले गुरुजी आणि अंगणात उडणारे फटाके ह्यांत आम्ही गुंगून जायचो. पूजा झाली की आरती व्हायची. बैठकीत पानसुपारीला पुरुष आणि घरातल्या ओसरीवर हळदीकुंकवाला आलेल्या बायका ह्यांची लगबग असायची. आम्ही मात्र वेण्या वर बांधून, फ्रॉकच्या घेर आवरून, फटाके उडवण्यात मग्न असायचो. वीज तेव्हा गावात नव्हतीच. त्यामूळे त्या सुंदर गर्द काळोखात पणत्यांचा प्रकाश आणि भुइनळे, भुइचक्रे, हातचक्रे ह्यांची आतषबाजी विलक्षण देखणी दिसायची. मोठे भाऊ लक्ष्मी बॉम्ब, सुतळी बॉम्ब आणि बहीण लवंगी फटाक्यांच्या लडी उडवत असायचे. लिंबूटिंबू मी मात्र लड सुटी करून एकेक लवंगी फटाका उडवण्यातच खुश असायची! फटाक्यांच्या दारूचा वास, केसातली शेवंती, हातावरचे हीना अत्तर,अंगावरचे कोरे कपडे, सगळ्या वासांचे मिश्रण भारून टाकणारे असायचे.
अमावस्येचे आकाश चांदण्यांनी फुललेले आणि आमचा वाडा आनंदाने बहरलेला असायचा. लक्ष्मीपूजनाची संध्याकाळ हाच दिवाळीचा उत्कर्षबिंदू असायचा. पाडवा तुलनेने सुस्त असायचा. भाऊबीजेला भावांना ओवाळण्याची लगबग असली तरी दिवाळी संपत आल्याची हुरहुरती किनारदेखील असायची.
*फडे म्हणजे पंख्याच्या आकाराची आणि लहान मुठ असलेली केरसूणी.
अंशतः पूर्वप्रसिद्धी - आकाशवाणी अस्मिता वाहिनी
स्मरणिका - महाराष्ट्र मंडळ सिंगापूर.
No comments:
Post a Comment