Tuesday, 20 May 2014

वंगरंगी रंगले मी -वर्षा

काहिलीसारखी उष्णता तीक्ष्ण शस्त्राच्या वाराप्रमाणे मर्माचा वेध घेत चाललेली. मानवी शरीराची सहन शक्ती पणाला लागलेली. घामाच्या धारांनी उरलेसुरले त्राण पण नाहीसे होत चाललेले. कोरड्या होत जाणाऱ्या गळ्याबरोबरच जणु प्राणही सुकत चाललेले. 

अन अचानक हवेतील गरमी कमी होते. सोसाट्याचा वारा सुटतो. वाऱ्याबरोबर उडणारे वाळूचे कण डोळे उघडे ठेवणे कठीण करतात. काहीतरी आधाराला असल्याशिवाय रस्त्यात उभे राहणेही अशक्य होऊन जाईल एवढा वाऱ्याचा जोर वाढतो. चालणारी माणसे वाऱ्याच्या रेट्याने हे्लकावत झोकांड्या खाऊ लागतात.

वा-यामुळे आपटणाऱ्या दारेखिडक्यांचे आवाज, उंचावरून उडणाऱ्या, पडणाऱ्या वस्तू वातावरण भीतीदायक करतात. काहीतरी होणार आहे, काहीतरी भयंकर घडणार आहे असे वाटायला लागते. वादळापूर्वीच्या शांततेविषयी आपण ऐकलेले असते. पण हे मात्र वादळापूर्वीचे वादळ आहे ह्याची खात्री अंतर्मनाला पटत जाते.

आकाशावर जणु कोणी धारे झाकून टाकावे तसा काळोख पसरतो. ‘नभ मेघांनी आक्रमिले’ ह्या ओळींची अनुभूती येत जाते आणि मग होते पावसाचे आगमन.

भले मोठ्ठाले टपोरे थेंब तडतड ताशासारखा आवाज करीत जमिनीला सडकून काढतात. क्षणभर त्यांची गुर्मी टिकते न टिकते तोच त्या थेंबांची सारी मस्ती वारा उतरवून टाकतो आणि त्यांना पार कुठल्याकुठे वाहून नेतो. भन्नाट वाऱ्यामुळे हवेतच वाहत जाणाऱ्या पावसाच्या लाटा दिसायला लागतात. इतक्या तलम, इतक्या तरल की काही क्षणापूर्वी हाच पाउस तडतडाट करीत जमिनीला झोडपून काढीत होता हे खरे वाटेनासे होते. 

त्याच वेळी आभाळात वीज चमकून जाते. ह्या वीजेच्या चमकण्याने भयचकित झालेले मन जरा कुठे सावरते तोच भयंकर जोरात घनगर्जना होते. जीव धसकतो. हृदयाचे ठोके जलद गतीत पडून स्वत:चे अस्तित्व जाणवून देतात. सारेच प्रियजन सुरक्षित ठिकाणी असतील ना ह्याची काळजी वाटू लागते. कसली तरी अनाम हुरहूर मनात दाटून येते. कसली? माहिती नाही. इतके सारे उन्हाळे-पावसाळे सोसून, भोगून देखील अजूनही कळले नाही.

ह्यावर्षी पहिल्या पावसाचा अनुभव देणारी होती नॉर्वेस्टर्स. उत्तरेकडून, पश्चिमेकडून येणारे थंड वारे, ईशान्य भारतात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वाढलेली आर्द्रता ह्या साऱ्याच्या परिणामाने येणारे वादळ म्हणजे नॉर्वेस्टर्स. असा वादळाचा अनुभव ह्या आधी ना महाराष्ट्रात कधी आला होता ना सिंगापूरमधे. ही नोर्वेस्टर्स म्हणजे बांगलादेश आणि त्याला लागून असणाऱ्या भारतीय प्रदेशाची खासियत.

 तुफान प्रलयकारी वादळ, त्या बरोबर येणारा पाऊस. त्या पावसाने तापमान ३७ वरून एकदम ३० वर आणून ठेवले हे माझ्यासारख्या अनेक कोलकातावासियांना सुखावून टाकणारेच ठरले. पण कित्येक लोक असेही होते की ज्यांच्यासाठी हे वादळ सुखद नव्हते. कारण त्यांच्या डोक्यावरचे छप्पर वादळाने उडून गेले होते, झाडे पडून घरांची वाताहात झाली होती. अचानक आलेल्या वादळात जे सुरक्षित स्थळी पोचू् शकले नाहीत त्यांना प्राणही गमवावे लागले होते. सरोवराच्या काठी फिरायला गेलेल्या लोकांनी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली घेतलेला आसरा त्यांना महागात पडला होता. काहीजण जबर जखमी तर दोन जणांना प्राणही गमवावे लागले. खरे तर विजा चमकत असताना झाडाखाली उभे राहु नये, हा धडा सगळेच शाळेत शिकलेले असतात. तरी असे कसे होते? शिकलेली विद्या ऐनवेळी विसरले जाण्याचा कर्णाला मिळालेला शाप आपण वारश्यात अजुन भोगतो आहोत की काय?

तरी असे म्हणतात की ह्यावर्षीची वादळे तुलनेने कमी तीव्र स्वरूपाची होती. ह्या वादळाच्या रौद्रभीषण स्वरूपामुळे, त्याने होणाऱ्या मालमत्तेच्या नुकसानीमुळे आणि प्राणहानीमुळे त्याचे बंगालीतले नावच मुळी, "काळबैषाखी "आहे. सहसा वैषाख महिन्यात काळ होऊन येणारे वादळ म्हणून काळबैषाखी !

मे महिन्यात अशा २/३ छोट्या मोठ्या वादळांनी हजेरी लावल्यावर जूनचा पहिला आठवडा मात्र मॉन्सूनच्या प्रतिक्षेत गेला.

एप्रिल/मे महिन्यात, कडक उन्हात देशातल्या बाकी सगळ्या नद्या पावसाची वाट पाहत आपापली सुकत चाललेली पात्रे सांभाळत होत्या, तेव्हा आसामात मात्र पूराने हाहा:कार माजला होता. ब्रम्हपुत्र नद तसाही भारतीय उपखंडातील इतर नद्यांपेक्षा आगळावेगळाच. बाकी साऱ्या नद्या आपापली स्त्रीलिंगी नावे अभिमानाने मिरवत असताना हा मात्र एकमेव पुरुषी नाव धारण करणारा, नदी नव्हे तर नद!!! पण आपण सवयीने त्याचे, ’तो ब्रम्हपुत्र’ बदलून ’ती ब्रम्हपुत्रा’ करून टाकले आहे !! 

 तिबेट, भारत आणि बांगलादेश अश्या तीन प्रदेशांतून वाहणारा हा नद. आशिया खंडातील मोठ्या नद्यांपैकी एक. पावसात तर ओसंडून वाहतोच पण वसंतातही वितळणाऱ्या बर्फाने फोफावत, आपल्या पूराने थैमान घालतो. तीनही प्रदेशात ह्याला वेसण कशी घालावी, ह्याचा उपयोग कसा करून घ्यावा ह्यावर चर्चासत्रे चालू असतात. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करत, आपापल्या देशाला उपयोगी असणारे काम घडवून आणणे व दुसऱ्या देशाने केलेल्या उपाययोजनेमुळे आपल्या देशातल्या नदीच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही ना हे जागरुकपणे बघणे हे या समितीतील तज्ज्ञांचे काम असते. गेली काही वर्षे चीनने ब्रम्हपुत्रवर म्हणजे यार्लुंग त्सांगपो वर एक प्रकल्प उभारला असल्याची कुणकूण होती. चीन मात्र हिरीरीने या वृत्ताचा इन्कार करीत होता. नुकतेच एप्रिल २०१० मधे चीनने आपण एक जल-विद्युत प्रकल्प उभारत असल्याची कबुली दिली आहे. त्याचबरोबर ह्या प्रकल्पाचा भारतातील ब्रम्हपुत्रवर काहीही विपरीत परिणाम होणार नाही ह्याची ग्वाही देखील दिली आहे.

मध्यंतरी बांगलादेश आणि चीनच्या पंतप्रधानांची ब्रम्हपुत्रच्या विषयावर चर्चा झाली अशी बातमी वाचली. आंतरराष्ट्रीय राजकारणात ब्रम्हपुत्र महत्वाची भुमिका बजावणार हे नक्कीच.

ब्रम्हपुत्रवर होणारे प्रकल्प, घातले जाणारे बांध, जलविद्युत प्रकल्प उ्भारले गेले तर ती उर्जा या सगळ्याच ईशान्येकडील राज्यांचे जीवन खूप सुखाचे करतील.

जूनमधे मॉन्सून किती तारखेला कोकण आणि मुंबईत पोचेल ह्याचे वर्तमानपत्रातले अंदाज, महानगरपालिकेने नाले सफाईचे काम पूर्ण झालेले आहे ह्याची दिलेली ग्वाही, आरोग्य संचालनालयाने पाणी उकळून प्या, उघड्यावरचे अन्न खाऊ नका हा दिलेला इशारा ह्या सगळ्याने मुंबई/ठाण्या्त पावसाळा जवळ आल्याची जाणीव होते. पावसाळ्यात पाणीपुरी, भेळ खाता येणार नाही की काय ह्या आशंकेने भरपेट चाट खायला सुरूवात होते. तशीही चातुर्मास पाळायची पूर्वतयारी म्हणुन कांदेनवमी साजरी करायची आपली परंपरा आहेच, नाही का? 

 इथे कोलकात्यातही वर्तमान पत्रातून वेगवेगळे सल्ले यायला सुरूवात झाली, तेव्हाच मनात म्हणले की आला वाटते खरा पावसाळा जवळ. जेव्हा ते सदर वाचायला सुरूवात केली तेव्हा लक्षात आले की अरे हे तर काही वेगळेच आहे प्रकरण. ते सल्ले असे होते, "जागरण कराल तेव्हा फास्ट फूड खाऊ नका. कमीतकमी ४ तास झोप मिळेल ह्याची काळजी घ्या. पॉवर-नॅप्स घ्यायचा आधीपासून सराव करा. महत्वाचे म्हणजे पुरेसा आधी वेळापत्रकाचा अभ्यास करून त्याप्रमाणे शिफ्ट्स बदलून घ्यायचा प्रयत्न करा." 

कोलकात्यातील अत्यंत महत्वाचा मोसम सुरू झाला होता- फूट्बॉल वर्ल्ड कपचा!! दर चार वर्षांनी येणारा हा मोसम भयंकर वादळी, उत्कंठाजनक, भान हरपून टाकणारा आणि हवाहवासा!! तसाही कोलकात्यातील प्रचंड मोठ्या मैदानांवर पावसात भिजत वा उन्हात तापत, भान हरपून फूटबॉल खेळणारे खेळाडू पहाणे, हा एक जिवंत व रसरशीत अनुभव असतो.

खरे तर पाऊस वैशाखाच्या शेवटी वा ज्येष्ठाच्या सुरूवातीलाच सुरू होतो. पण पाऊस म्हटला की भारतीय मनाला न चुकता आठवतो तो आषाढाचा पहिला दिवस आणि अर्थातच मेघदूत आणि मग कवी कालिदास. प्रियेच्या विरहाने व्याकुळ होऊन मेघासोबत तिला निरोप पाठवणारा यक्ष. तिच्या आठवणीने तळमळत असताना देखील विरहाच्या काळात केवळ आठवणच प्राण-विसावा बनू शकते ह्याची अगदी आरपार अनुभूती देणारा. मेघदूताने आजवर किती मनांना आधार दिला असेल, सुखावले असेल त्याची गणतीच नाही.

कालिदासाप्रमाणेच कोणत्याही कवीसाठी किंवा खरे तर कोणत्याही कलावंतासाठी हे किती मोलाचे की त्याच्या नावावरून त्याची कलाकृती ओळखली न जाता, त्याच्या कलाकृतीवरून तो आठवावा !! पावसाचे आणि कवीचे नाते तसेही अतूटच. असे तर नसेल की पाऊस मनाच्या तळातले काही ढवळून टाकत असावा आणि पावसाच्याच उत्स्फूर्ततेने, असोशीने ते मनातले काही शब्दात उतरवायला प्रवृत्त करीत असावा? 

-वृंदा 

-खास ऋतुगंधसाठी,वंगभूमीतून ,वृंदा टिळक.

ऋतुगंध -वर्षा २०१०




No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...