Monday, 20 October 2014

वंगरंगी रंगले..

बालमित्रांनो, 


स्वामी विवेकानंद म्हणले की आपल्या डोळ्यापुढे उभे रहातात ते भगव्या कपड्यातले, हाताची घडी घालून, धीरगंभीर नजरेने पाहणारे विवेकानंदच उभे रहातात ना? लगेच आपल्या कानात, "अमेरिकेतील माझ्या बंधू भगिनीनो "असे शब्द पण ऐकू यायला लागतात. तुम्हाला म्हणून सांगते, मला तर ह्या वाक्यानन्तरचा टाळ्यांचा कडकडाट पण ऐकू येतो दरवेळी!!!

कोलकात्यातील बिधान सारणी जवळच्या विवेकानंदांच्या घरी जेव्हा बाल वयातील, तरुण वयातील, मोकळ्या केसांच्या, उत्सुक डोळ्यांच्या नरेन्द्राचे फोटो पहिले तेव्हा एकदम मजाच वाटली. लांब केसांच्या कपाळावर रुळणाऱ्या बटा असणारे, विदेशी पोशाखातले नरेन्द्राचे रूप एकदम गोजीरवाणेच दिसते. आता विवेकानंद यांच्या विषयी बोलता बोलता मी मध्येच ह्या कोणा नरेन्द्राविषयी का सांगायला लागले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडणार नाही, हे मला माहिती आहे. कारण तुम्ही सगळेच हुशार मुले असल्याने विवेकानंदांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते हे अर्थातच तुम्हाला माहिती असणारच!!!

विवेकानंदांचे घर एकदम ऐसपैस आणि खानदानी थाटाचे आहे. त्यांचे वडील कोलकाता येथील यशस्वी वकील होते. त्यांच्या रुबाबाला साजेसेच त्यांचे घर आहे. वडिलांच्या मृत्यू नंतर मात्र परिस्थिती खालावत गेली. काही वर्षांनी वाटण्या होऊन ह्या घरात मधेच भिंती उभ्या राहिल्या. कालांतराने अनेक भाडेकरू त्या घरात राहू लागले. त्या घराचा रुबाब नाहीसा होऊन ते अगदी छोट्या छोट्या खोल्यांचे, काहीही आराखडा नसलेले असे बकाल वास्तू बनले. जसजशी वर्षे गेली, तसतसे तर दुरुस्तीच्या, निगराणीच्या अभावी तर ते अधिकच केविलवाणे दिसू लागले. 

मग एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे रामकृष्ण मिशनने केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने त्या दुरावस्थेतल्या घराची जागा आणि त्याच्या बाजूची जागाही हस्तगत केली. पुरातत्व विभाग तसेच देशभरातील नामवंत वास्तुशिल्पीन्च्या मदतीने ते घर पूर्वी होते तसेच परत पुनर्स्थापित केले आहे. आता त्या जागेत एक संग्रहालय, एक वाचनालय तसेच विवध ज्ञान शाखांमध्ये संशोधन करणारे एक केंद्र, एक सांस्कृतिक केंद्र तसेच रामकृष्ण मिशनची एक शाखा असे सर्व वसले आहे. फार प्रसन्न आणि सुंदर वास्तू झाली आहे ती. 

तुम्ही कधी गेलात कोलकात्याला तर आईबाबांच्या मागे लागून नक्की ही वास्तू बघून या. जिथे विवेकानन्दान्चा जन्म झाला त्या जागेवर एक भव्य सिंहासन व त्यांचा फोटो आहे. त्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबाने वापरलेल्या वस्तू, त्यांच्या खोल्या जतन करून ठेवल्या आहेत. एक ध्यान मंडप आहे. जिथे नरेंद्राची आई व पुढे नरेन्द्रही पूजा करायचा ते घरातच करवून घेतलेले शंकराचे मंदिरही आहे. 

तिथे जायच्या आधी विवेकानंद ह्यांच्या विषयी काही वाचूनही जा. त्यांचे आयुष्य, त्यांचे कार्य, त्यानी जगाला केलेले मार्गदर्शन ह्याविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर ती वास्तू पहाताना तुम्हाला आणखीनच छान वाटेल. कोलकात्याला गेलात तर दोक्खीनेश्वर मंदिर आणि बेलूर मठ पहायला अर्थातच विसरू नका. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद ह्यांच्या प्रेरणेने व वास्तव्याने पवित्र झालेल्या वास्तू आहेत त्या. दोक्खीनेश्वराच्या मंदिरात कालीमातेचे पुजारी होते रामकृष्ण परमहंस. तिथे त्यांची व मा. शारदादेवींची राहण्याची जागा पहायला मिळते. 

बेलूर मठाची रचना एकदम वेगळी आहे. विविध वास्तुशैलीन्चा आविष्कार व संगम आपल्याला तेथील रामकृष्ण मंदिरात पहायला मिळतो. त्याच आवारात विवेकानंद व मा. शारदादेवींची पण मंदिरे आहे. भव्य, शांत आणि सुंदर आवार, त्यात अनेक सुगंधी फुलांची झाडे तसेच अनेक फळझाडे आहेत. मागे गंगामाई वाहाते आहे. बेलूर मठ हा प्रत्येकाने जाणून घेण्याचा एक अनुभव आहे हे नक्की. 

तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात कधी ना कधी तुम्ही सुभाषचंद्र बसूंचे नाव नक्की वाचले असेल. " तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा!!" हे त्यांचे वाक्यही कुठ्लायातरी परीक्षेत विचारले गेले असेल. कदाचित सिंगापुराच्या एस्प्लनेड पार्क मधील आझाद हिंद सेनेचे स्मारकही तुम्ही पाहिले असेल. अजूनपर्यंत पाहिले नसाल तर हिल व्यू अवेन्यू कडून बुकित तिमाह रोड ला येताना ओल्ड फोर्ड factory म्युझियम आहे तेही जरुर पहा. नेताजींचा आणि सिंगापूरचा फार जवळचा संबंध आहे. आझाद हिंद फौज म्हणजेच INA ची स्थापना आणि कार्य ह्यात सिंगापूरचा मोठा वाटा आहे. 

कोलकाता येथे त्यांचे घर आता संरक्षित वास्तू म्हणून घोषित झालेले आहे. तेथेही आता म्युझियम आहे. ब्रिटीश सरकारच्या नजरकैदेतून ते कसे निसटले ह्याची चित्रफीत पाहिल्यावर मग जेव्हा आपण त्या मार्गिकेवर केलेली पदचिन्हे पहातो, तेव्हा तो थरार आपणही प्रत्यक्ष अनुभवत आहोत असेच वाटते. सिंगापूरला असलेल्या स्मारकाची प्रतिकृती देखील आपल्याला कोलकाता येथील नेताजी भवनात पहायला मिळते. 

चौरंगी रोडवरील नेहरू चिल्ड्रेन'स म्युझियम तर पहाच पण त्या आवारात मुलांसाठी चालणारे विविध प्रकल्प देखील जरूर पहा. 

सर्व बाल मित्र मैत्रीणीना आवडतील अशी कोलकाता येथील ठिकाणे म्हणजे Birla Planetorium, Birla museum, Science city आणि वेगवेगळी थीम पार्क्स. ती साधारणपणे सर्व जण पहातातच. पण स्वामी विवेकानंदांचे घर वा नेताजींचे घर पहाण्यासाठी मात्र कदाचित तुम्हाला आई बाबांमागे हट्ट करायला लागेल. चांगल्या गोष्टींसाठी हट्ट करणारी मुले अर्थातच चांगलीच असणार!!!!

आता मी सांगते आहे त्या सगळ्या वास्तू म्हणजे विवेकानंदांचे घर, नेताजींचे घर वा रामकृष्ण परमहंस राहायचे ते घर, हे का पहायचे? त्या महान लोकांचे केवळ घर पहायचे म्हणून? त्यांच्या वापरातील विविध वस्तू, त्यांची छायाचित्रे पहायला मिळावी म्हणून? मला तर नेहमी वाटते की त्या वास्तूत एक प्रत्ययकारी अनुभव आपली वाट पहात असतो. ही सारी माणसे का व कशी मोठी झाली त्याचा विचार करावासा वाटतो. त्यांची शिकवण, त्यांचे कार्य समजून घ्यावेसे वाटते. आपापल्या कुवतीनुसार त्यातले काही आपल्या वागण्यात आणावेसे वाटते. ह्या साठी पहायची असतात ही घरे. नाहीतर फोटो काय आपल्याला घरबसल्या नेटवरूनही पहाता येतातच की!!! 

आता घरबसल्या करता येण्याजोगा आणि बंगाली संस्कृतीचा परिचय करून घेता येण्याचा आणखी एक सोपा उपाय सांगू?बंगाली पुस्तके वाचा!!! आता तुम्ही म्हणाल की, "आम्ही कशी वाचणार बंगाली पुस्तके? आम्हाला कुठे बंगाली भाषा येते? " घाबरू नका. आपल्याला एक युक्ती तर करता येईलच!! बंगाली पुस्तकांची मराठी, इंग्रजी भाषांतरे वाचता येतील ना?!!! 

तुम्ही सत्यजित राय ह्यांचे नाव ऐकले आहे का कधी? खूप प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक होते ते. त्यांना सिनेक्षेत्रातले काय करता येत नव्हते ह्याचा शोधच घ्यावा लागेल. स्क्रिप्ट लिहिणे, दिग्दर्शन करणे, एडिटिंग इत्यादी अनेक गोष्टी ते उत्तम रीतीने करायचे. त्यांच्या अनेक चित्रपटांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बक्षिसे मिळालेली आहेत. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात चित्रकार म्हणून केली. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील तुम्हाला आवडतील अशी पुस्तके म्हणजे फेलुदाच्या विविध कथा. फेलुदा हा एक तरुण मुलगा असतो. त्याला रहस्यकथा वाचायला खुप आवडत असतात. रहस्यकथा वाचून, विचार करून तो हळू हळू स्वत: एक डिटेक्टीव बनतो. त्याला मदत करणारा असतो त्याचा किशोरवयीन भाऊ तोपशे!!! 

(हे ऐकून बोक्या सातबंडे आणि त्याच्या दादाची किंवा फास्टर फेणेची आठवण होते ना? अरे, तुम्ही वाचले आहेत की नाही हे दोन्ही? अजूनपर्यंत नसेल वाचले तर आपल्या महाराष्ट्र मंडळ सिंगापूरच्या वाचनालयात बोक्या सातबंडे तसेच फास्टर फेणे ही पुस्तके आहेत, नक्की वाचा. )

आपण फेलुदाच्या साहस कथांविषयी बोलत होतो ना??!!! तर मग फेलुदा वेगवेगळ्या रहस्यांची उकल करत असताना तोपाशे त्याला मदत करत असतो. त्यात त्यांच्यावर कोसळणारी संकटे, येणाऱ्या अडचणी, विचार करून उलगडवलेले रहस्य. पहाता पहाता आपण पण त्यात गुंतत जातो. 

सत्यजित राय ह्यांच्या फेलुदान्च्या गोष्टींची इंग्रजी भाषांतरे तर उपलब्ध आहेतच पण नुकतेच मराठी भाषांतर पण आले आहे. अशोक जैन यांनी मराठी अनुवाद केलेला " Fantastic Feluda "हा १२ पुस्तकांचा संच नुकताच २६ ऑक्टोबर ला प्रकाशित झाला आहे. फेलूदाच्या साहसानी चित्रपट निर्मात्यांना पण मोहात पाडले आहे. त्यावर चित्रपट देखील निर्माण केले गेले आहेत. 

सत्यजित राय ह्यांनी अनेक विज्ञान कथा पण लिहिल्या आहेत. प्रोफेसर शोंकू हा त्यांच्या विज्ञान कथांचा नायक. त्याचे जबरी शोध, साहसे, संकटे हे सगळे वाचायलाच हवे. 

बालामित्रानो, आता येते आहे डिसेंबर ची सुट्टी. त्या सुट्टीत करण्यासाठी बरेच प्रकल्प तुमच्याकडे जमा झाले ना? पण हे सगळे केल्यानंतर रोशोगुल्ला खात खात तुम्ही, "खूब भालो " म्हणाल ह्याची मला खात्री आहे!!!

वृंदा टिळक

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...