Wednesday, 4 March 2015

तळ्यात … मळ्यात …


बचत गटातल्या बायका मीटिंग संपवून घरी जात होत्या. थोडा वेळ त्यांच्याशी ख्यालीखुशालीचे बोलून झाल्यावर नीरजा पुढे चालू लागली. ऑफिस ते घर, चालत जायला अवघे दहा मिनिट लागतील एवढेच अंतर. पण ते पार करायला, वाटेत भेटणाऱ्या लोकांशी चार शब्द बोलत येत, नीरजाला अर्धा तास तरी लागायचा. त्या लहान गावात सगळेच एकमेकांना ओळखणारे, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी असणारे. नीरजावहिनी, नीरजाताई, नीरजा मावशी, काकू, आत्या, नीरजा, नीरु किती नावांनी तिला बोलावणारे आणि तिच्याशी जोडले गेलेले हे सगळे लोक, तिचे आप्तच बनले होते. सतत ‘नीरजा’ नाव ऐकताना तिला अधूनमधून आपल्या आजीची आठवण यायची. आजीच्या ‘नीरा’ ह्या नावाची आठवण म्हणून तर तिचे नाव नीरजा ठेवले गेले होते ना!

नीरजाच्या आजीचे, 'नीरा'चे सगळे विश्व म्हणजे तिचे घरच होते. एकत्र कुटुंबात ३५/४० माणसे. सगळे काम करताकरता दिवस उगवला कधी आणि मावळला कधी हे देखील कळत नसे. बायकांनी घराबाहेर पडायची पध्दत नव्हतीच. लग्नानंतर सुरुवातीची काही वर्षे सोडली तर माहेरी जाण्याचीही संधी क्वचितच मिळायची. वयाच्या आठव्या वर्षी नीराचे लग्न झाले. मात्र त्या आधी तिच्या भावाने तिला लिहायला वाचायला शिकवले होते. सासरी आल्यावरही जमेल तेव्हा, जमेल त्या मार्गाने लिहिण्याचा सराव तिने चालू ठेवला. एवढेच नव्हे तर आपल्या तिन्ही जावांना आणि नणंदेला वाचायला शिकवले. त्या सगळ्याच रोजची पोथी असेल किंवा क्वचित मिळणारे वर्तमानपत्र असेल, वाचू शकत होत्या. त्या काळात हे फारच कौतुकास्पद होते. 

घराजवळ गर्दी दिसली आणि नीरजा आजीच्या आठवणीतून जागी झाली. तिच्या लक्षात आले आज मंगळवार, म्हणजे मोहनचा ‘प्रदिप्ता’चा दिवस. ‘प्रदिप्ता’ ह्या संस्थेच्या माध्यमातून शेणापासून इंधन आणि त्यावर स्वैपाकाच्या चुली, सोलार ऊर्जेपासून दिवे आणि पंखे, तसेच गरम पाण्याचे नळ घरोघरी लागले होते. वीज फक्त कॉम्प्यूटर्स आणि टी. व्ही. साठीच वापरली जात होती. ती वीजदेखील आसपासच्या तालुक्यांचे मिळून एक जलविद्युत केंद्र उभारून निर्माण करायची आणि सगळा परिसर स्वयंपूर्ण करायचा असे नीरजा आणि मोहनचे स्वप्न होते. कोणतीही गोष्ट एका ठिकाणी तयार करून ती लांबपर्यंत वाहून नेण्याचा खर्च कमी झाला कि आपोआपच ती स्वस्त होईल, असा त्यांचा विचार होता. एकूणच भाज्या, धान्य, उद्योग, कपडे सगळ्याच बाबतीत जर का प्रत्येकाने शक्य तेवढा स्थानिक माल विकत घेतला तर अनावश्यक खर्च व त्यामुळे वाढणाऱ्या किमती कमी होतील व जीवनमान सुधारेल ह्या ठाम विचारसरणीवर त्यांनी आपल्या आयुष्याचा मार्ग बेतला होता. मागे ठेवायची ती फक्त सत्कृत्ये, कार्बन फुटप्रिंट्स नाहीत असे मोहन नेहमी म्हणायचा. 

माणसे जोडण्याची, टिकवण्याची शैली आणि व्यवस्थापनकौशल्य दोन्हीचा पुरेपूर उपयोग करत ती दोघे गावात कल्याणकारी कामे उभी करत होती. 

फेसबूकवरील त्यांच्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपला ह्या दोघांचे फार नवल वाटायचे. आपापल्या विषयातले सुवर्ण पदक विजेते असून, जगभरातल्या अनेक संस्थांच्या भरपूर मान आणि पैसे देणाऱ्या ऑफर्स नाकारून ह्या दोघांनी एका लहान गावात आपले आयुष्य घालवायचा निर्णय कसा आणि का घेतला असेल आणि मुख्य म्हणजे आता ह्या निर्णयाचा त्यांना पश्चाताप होत असेल का ह्या विषयी त्या साऱ्यांनाच कुतूहल वाटत होते. 

नीरजा आणि मोहनने मात्र वेगळ्या आयुष्याचा कधी विचारच केला नव्हता. …
-----------------------------------------------------------------------------------------

आपल्या न्युयॉर्क मधील घरात रानी बसली होती. डोळे कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर होते पण कान मात्र रोबो वाक्यूमक्लीनर शेजारच्या खोलीत कशाला आपटत नाहीये ह्याकडे लागले होते. परवापासून त्याच्या इमेज मापिंग सिस्टीम मध्ये काहीतरी गोंधळ झाला होता. तितक्यात Google Hangout ची रिंग वाजली. “आईचा video call आलेला दिसतोय. आईला विडियो call करायला फार आवडते “ आईला तसे म्हणताच आई म्हणाली, ” हो ग, स्क्रीनवर तू प्रत्यक्ष दिसलीस आणि तुझा आवाज ऐकला कि समाधान होते बघ. तुम्ही मुले लांब जाता, आपले नवे विश्व वसवता. आईसाठी मात्र आजुबाजूला कितीही गोष्टी बदलोत, तिची मुलेच तिच्या विश्वाचा अविभाज्य भाग राहतात ". नातेवाईक, आईचे लिखाण, तिचा ज्येष्ठ नागरिक संघ, योगा क्लास, भजनी मंडळ, भाजीवाल्यांसाठी तिने सुरु केलेले साक्षरता वर्ग, आईच्या जगात नित्य नव्या घडामोडी घडत असायच्या. एवढ्या सगळ्याविषयी आईशी बोलून झाल्यानंतर रानीला रोजच्यासारखेच नवल वाटले. जगण्याचा किती उत्साह आहे हिच्याकडे आणि जगण्याजोगी कारणेही! आपल्याला तर आत्ताच कंटाळा यायला लागलाय. 

“मकरंदच्या फोनची पण वेळ झालीच आहे. अरे, आज आपल्या मनात त्याचे मकरंद हे नाव कसे काय आले? नाहीतर गेली अनेक वर्षे म्हणजे त्याने नाव बदलून Mak केल्यापासून आपणही त्याला Makच म्हणतो, प्रत्यक्षात आणि मनात पण. त्याच्या कामाच्या शांघाय, सिंगापूर, लंडन, टोरांटो अशा नानाविध ठिकाणी सगळीकडे चालेल असे नाव हवे असे त्याला वाटले आणि त्याने मकरंदचे MAK करून घेतलेसुध्दा. रजनीचीदेखील रानी झाली. इथे न्यूयॉर्कला आल्यावर मात्र व्हिजाच्या तरतुदीनुसार आपल्याला काम सोडून घरी बसावे लागलेय. आता त्या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण होऊन परत काम सुरु करायला किती दिवस लागणार आहेत कोणास ठाऊक? ” नेहमीप्रमाणेच दिवसातून शंभराव्यांदा तिच्या मनात येउन गेले. 

कामाशिवाय घरी नुसते बसायची तिला सवय नव्हती. कायद्यामुळे काम करता येत नाही, मुलगा होस्टेलवर, नवरा सतत बाहेर. ह्या एवढ्या मोठ्या दिवसाचे करायचे तरी काय असा प्रश्न रानीला पडायचा. 

कुठेही न आपटता रोबोने खोली साफ केली आणि तो पुढच्या खोलीत जाण्याआधी चार्जिंग स्टेशनला जाऊन चार्ज होऊ लागला. रोबोच्या इमेज मापिंगचे सेटिंग ठीक करताना वेळ कसा गेला रानीला कळले नाही आणि जेव्हा एवढा वेळ गेला असे तिच्या लक्षात आले तेव्हा तिला वाटले, ” चला, दिवसाचा बराचसा वेळ तर संपला. आता अजून काही तास काढले कि संपलाच म्हणायचा एक दिवस. ”
-----------------------------------------------------------------------------------------

“दादर सीट आहे का कोणी?” त्या बाईंच्या मोठ्या आवाजाने अवनी भानावर आली. “घाटकोपर गेलेसुद्धा इतक्यात? मनात रेंगाळत असलेले आणि इतस्तत: विखुरले जाणारे लेखनाचे दुवे जोडताजोडता कसा वेळ गेला कळलेच नाही. आता दाराजवळ जाउन उभे रहायला हवे. ऑफिसमध्ये पोचल्यावर दिवसभर आपल्या कथेचा विचार करायला देखील वेळ व्हायचा नाही. दिवाळी अंकासाठी कथा द्यायला उशीर होतो आहे. लवकर पूर्ण करायला हवी कथा. कोणत्या दिशेने चालले आहे आपण लिहितोय ते कथानक? "

"आपल्या कथेतील पात्रे ह्या पुढे काय करणार आहेत? काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात पुढे? आपल्या कथेतील नीरा ही व्यक्ती तर आता भूतकाळात जमा झाली. रानी आणि नीरामधला स्थळ-काळाचा फरक सोडला तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात. दृश्य आणि अदृश्य बंधनात जखडल्या गेलेल्या आणि पर्याय निवडण्याचे फारसे स्वातंत्र्य नसलेल्या पण एक मोठा फरक हा कि रानीच्या आयुष्यात निष्क्रियतेचा शेवाळलेला अंधार आहे तर नीरेच्या आयुष्यात मात्र बंधनातही प्रकाशाकडे जायची ओढ आहे. 

नकळत आपण त्या पात्रांची नावे पण एकमेकांचे प्रतिबिंब असावे अशीच निवडली आहेत आणि हे आत्तापर्यंत आपल्या साधे लक्षातदेखील आले नाही! म्हणजे मग आपण लिहित असतो तेव्हा आपले सुप्त मनच आपल्याही नकळत कथेची मांडणी करत असते कि काय? आणि मग ही नीरजा कोण? नीरा आणि रानीला जे करायचे होते आणि करता आले नाही अशा त्यांच्या इच्छांचे तर ते मूर्त रूप नव्हे? नीरजा असणे कितीही आदर्श असले तरी प्रत्यक्षात शक्य आहे का? नीरजाच्या तेजाची आदर्श उजळण तिला कोणी 'मोहन' भेटण्यावरच अवलंबून आहे किंवा ‘मोहन’ भेटला तरच शक्य आहे, असे तर आपल्या कथेतून प्रतीत होत नाहीये ना? रानीला व्हिजा च्या तरतुदींमुळे नोकरी करता येणार नाही, पण मग बाकी काय करता येईल ह्याचा का नाही ती विचार करत? ती नुसतीच भौतिक सुखे उपभोगत, कंटाळत, निष्क्रिय आयुष्याचे दिवस ढकलते आहे. स्वत:च्या क्षमतांची जाणीव आणि त्यांचा समाजासाठी उपयोग करण्याचे भान हे कोणतेही मानवी आयुष्य अर्थपूर्ण असण्यासाठी आवश्यक नाही का? 

कोणी कुठला पर्याय निवडावा हे ज्याच्या त्याच्या समजशक्ती, आवश्यकता, वृत्ती आणि जगण्याच्या रेट्यानुसार ठरेल. पण आयुष्यातील सकारात्मकतेचा ग्राफ नेहमी उंचावत नेला तरच त्या जगण्याला अर्थ आहे ना? रानीच्या आयुष्यातील संभ्रम मिटवायला ती एखाद्या संस्थेचे सेवाभावी काम करायला सुरुवात करते असे कथेत पूढे दाखवावे कि काय? " विचारांचा चक्रव्यूह अवनीची पाठ सोडत नव्हता. 

दादरला उतरून अवनी ऑफिसच्या दिशेने जात असतानाच तिचा फोन वाजला. रोहनचा फोन!
“काय म्हणतेय सिंगापूर? आज बरी बायकोची आठवण झाली? नाहीतर एरवी ऑफिसच्या टूरवर गेलास कि तिकडचाच होऊन जातोस? कधी येतोयस परत? ”

“ अग, हो, हो. जरा मला बोलू तर दे. आधीच तुझी प्रश्नांची बरसात सुरु. ”

“अरे मग बोल ना!

“मी तुला म्हणालो नव्हतो, तसेच झाले आहे. इथल्या ब्रांचने हेड ऑफिसला सांगून मला इथे पोस्टिंग दिले आहे. मला इथे येण्यासाठी चांगले दणदणीत आमिष ठेवले आहे समोर. एशिया पासिफिक हेड ही पोस्ट!! खूप चालेन्जिंग आहे ग! इतके दिवस मी जी एवढी मेहनत केली तिचे फळ आहे हे. सांग ना काय करू या? मला हे पद आणि इथली नोकरी दोन्ही फार फार आवडणार आहे. ड्रीम जॉब आहे. माझ्या करीयरच्या दृष्टीने तर फारच छान. एकदम ग्लोबल एक्स्पोजर मिळणार आहे. मला तर हो म्हणावे असेच वाटते आहे. तुझे काय मत आहे? तू म्हणशील ते मला मान्य आहे. पण तू इथे येणार असशील तरच मी ह्या नोकरीला हो म्हणेन हं. तुझ्याशिवाय, एकटे राहून, कितीही मोठी ऑफर असेल तरी मला नकोय ती.” रोहन उत्साहाने बोलत होता. 

“अर्रे ग्रेट न्यूज! यू डिझर्व इट! तसे तर जेव्हा मी तुला लग्नासाठी ‘हो’म्हणाले ना, तेव्हाच हे नक्की झाले होते कि तू खूप लकी आहेस म्हणून!! आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले एवढेच!! जोक्स अपार्ट, मला खरंच खूप अभिमान वाटतो तुझा. एवढ्या लहान वयात एवढी मोठी पोस्ट, ग्रेटच”

“Thanks! मग काय 'हो' सांगू ना त्यांना?” 

अवनी भांबावली. जरी रोहनला कधीतरी सिंगापूरला शिफ्ट व्हावे लागेल अशी कुणकुण आधी लागली होती तरी आत्ताच, ह्याच ट्रीपमध्ये एवढे सगळे होईल असे वाटले नव्हते. 

“अरे थांब थांब … ज़रा वेळ मागून घे त्यांच्याकडून. आपण विचार करून ठरवू या ना, काय करायचे ते आणि हे बघ आता आलेच माझे ऑफिस. गेल्या गेल्या लगेच मीटिंग आहे मला. मी तुला करते मीटिंग संपल्यावर परत फोन. बाय “

फोन बंद करून अवनी लिफ्टमध्ये शिरली. सिंगापूरला गेलो तर आपल्या इथल्या कामाचे काय? फर्म आपला क्लेम ठेवेल का? आपण किती दिवसांनी परत येणार हे तरी कुठे माहिती आहे? तिथे जाऊन आपण काय करणार? आपल्याला नोकरी करता येईल का तिथे? इथले सगळे आप्त, सुहृद … त्यांना सोडून जायचे? आणि निवारा अनाथाश्रमात आपण आठवड्यातून एकदा गंमतशाळा घेण्यासाठी जातो त्याचे काय? रोहन बरोबर राहणे सर्वात महत्वाचे आहेच ह्यात काही शंकाच नाही. पण हे सगळे प्रश्नही महत्वाचेच आहेत. नीट विचार करून निर्णय घ्यायला हवा. सिंगापूरमध्येही नवे विश्व उभारता येइलच, नक्की उभारता येईल हा विश्वास आहेच पण तरीही … 

लिफ्ट २५व्या मजल्यावर थांबली होती. बाहेर पडून आपल्या केबिनमध्ये जाता जाता अवनी थबकली. केबिनच्या झुलत्या दाराच्या काचेत आपले प्रतिबिंब आहे कि नीरा /रानी किंवा नीरजा ह्यातल्या कोणाचे, तिला कळलेच नाही.
 
-वृंदा टिळक 
( ऋतुगंध -शरद -2015)
आकाशवाणी मुंबईवर मे २०१७ मध्ये प्रसारित.

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...