Wednesday, 4 March 2015

लेट इट गो, लेट इट गो !!

३२ व्या मजल्यावरच्या आपल्या घरातल्या खिडकीच्या काचेला नाक लावून रिया बाहेर बघत होती. बाहेर मुसळधार पाउस पडत होता. समोरची टेकडी ओलीचिंब हिरवी दिसत होती. खिडकीच्या काचेवर आतून रियाच्या श्वास आणि बाहेरून ओघळणाऱ्या पाउसधारा ह्यामूळे बाष्पाचे मजेदार नक्षीकाम तयार होत होते. तोंडातून हवा सोडून ते बाष्प वाढवायचे आणि त्यात बोटाने रेघा काढायच्या खेळात रिया रमली. 

तितक्यात फोनची रिंग वाजली. रिया धावत फोनपाशी गेली पण आधीच फियानाने - त्यांच्या मेडने फोन उचलला होता. "येस मॅम, शुअर मॅम, विल डू सो मॅम" फियानाचे बोलणे ऐकताच पलीकडे ममाच असल्याची रियाची खात्री पटली. आज ममा रियाला बाहेर घेऊन जाणार होती. कित्ती दिवसांनी ममाबरोबर बाहेर जायला मिळणार म्हणून रिया एकदम खुश होती. आपला आवडता गुलाबी फुले, पोपटी फुलपाखरे असलेला फ्रॉक घालून ती तयार होती. फियानाला सांगून तिने गडद निळे, पिवळे ठिपके असलेले शूज पण तयार ठेवले होते. आधी फियाना नाहीच म्हणत होती. म्हणाली, " रिया, धिस वोन्ट लुक गुड. आयदर यु वेअर पिंक ऑर ब्लाक शूज. " पण रियाने नाहीच ऐकले. "दर वेळी काय चांगले दिसतील तेच घालायचे. आज मला हवे आहेत तेच मी घालणार. "मग शेवटी फियानाने ऐकले. आता ममाचा फोन आला कि शूज घालायचे आणि बाहेर पडायचे. तर फियाना म्हणाली, "वेट रिया, डोन्ट गो. ममा विल बी लेट टुडे. "
"ओ नो नॉट अगेन" रिया हिरमुसली. पण रडली नाही. आता ती बिग गर्ल झाली होती ना, मग रडणार कशी? 

परत खिडकीजवळ जाउन रिया पाउस बघत बसली. खाली स्विमिंग पूल मध्ये पावसाचे थेंब पडून गोल गोल खड्डे क्षणभर पडायचे, परत पुसले जायचे. टेकडीवरून पण आता पाण्याच्या धारा वाहत येत होत्या. आकाश मात्र मगाचपेक्षा आता खूपच निळे होते. बहुतेक सगळे ढग रिकामे होऊन घरी गेले वाटते. पण तो कोपऱ्यात एकटाच ढगुला का बर बसलाय? 

"तू पण तुझ्या ममाची वाट पहातोयस का रे?" रियाने विचारले. "कोणाला विचारते आहेस? मला का?" ढगुला इकडे तिकडे बघत म्हणाला. "हो तुलाच विचारते आहे. तुझे सगळे फ्रेंड गेले तरी तू एकटाच का आकाशात थांबला आहेस?"अग, आज मी पहिल्यांदाच पाउस पाडणार होतो. पण थोडे घाबरत होतो. तर सगळ्या फ्रेंड्सनी बघ ना, केवढा पाउस पाडून टाकला. आता इथे अजून पाउस कशाला पाडायचा, असा विचार करत होतो मी. "

"आता काय करणार तू?"तेच ना" पाउस न पाडताच तसेच मला घरीपण जाता येणार नाही. सगळे जण हसतील. भित्रा भित्रा म्हणून चिडवतील. "

"मग एक काम करशील का? तू आमच्याबरोबर इंडियाला चल. आम्ही उद्याच सकाळच्या फ्लाईटने जाणार आहोत. तिकडे ह्या वर्षी पाउस कमी झालाय असे आजी म्हणत होतीच. मग तिकडे पाड तू पाउस. "

"पण मी येणार कसा?"

"त्यात काय, माझ्या फ्रोझनचे चित्रवाल्या निळ्या handbagमध्ये बसून ये."

ढगुला मग हळूच टेरेस मधून आत आला. रियाने त्याला गुपचूप, फियानाला दिसू न देता आपल्या handbag मध्ये ठेवून दिला. त्याला गुदमरू नये म्हणून bag पूर्ण बंद न करता थोडी फट पण ठेवली. 

फियानाला सांगून तिने फ्रोझनची सीडी लावली. लेट इट गो, लेट इट गो. गाणे सुरु झाले तर फियाना म्हणाली, " आता जेवून घे. ममाने सांगितलेय तुला वेळेवर जेवून, मग दात घासून, नाईट ड्रेस घालून झोपून जायला. "

रिया तर नेहमीच शहाणी मुलगी होती. ती लगेच उठली, जेवून, दात घासून झोपली. उद्या लवकर उठायचे होते. सक्काळी अंधार असतानाच त्यांना घरातून निघायचे होते. 

रियाला लवकरच जाग आली. पटापट सगळे आवरले. ढगुल्याला हळूच बघितले. विमानात शहाण्यासारखे वागायचे प्रॉमिस त्याच्याकडून घेतले. 

सिक्युरिटी चेकच्या वेळी त्या मशीनवरच्या चित्रात ढगुला दिसला तर काय करायचे ह्या विचाराने रियाला थोडी भीती वाटली. पण त्या अंकलना ढगुला दिसलाच नाही. हळूच bagच्या बाहेरून ढगुल्याला थोपटून रियाने bag ममाकडे वर ठेवायला दिली. 

रियाने दोन तीन गेम खेळले. जेवली. मग तिला झोपच आली. धक्का बसला म्हणून ती जागी झाली तर विमान जमिनीला टेकत होते. ढगुल्याला एवढ्या धक्क्याने काही लागले तर नसेल ह्या विचाराने रिया घाबरली. पण आईने तिच्या हातात bag दिल्यावर तिने हळूच पाहिले तर ढगुला मजेत हसत होता. त्याच्या पहिल्याच विमानप्रवासाने जाम खुशीत होता. 

एअरपोर्टवर आजीची गाडी आली होती. लगेच रिया आणि ममा पुण्याला जायला निघाले. इंडियाला आलो म्हणून ममा खुशीत होती. तिचे मैत्रिणीना फोन करणे सुरु होते. काहीतरी सवाई सवाईच्या गप्पा चालल्या होत्या. 

आजीच्या घरी पोचताच रिया आजीच्या गळ्यात पडली. आजीने केलेला यम्मी खाऊ खातानाच तिला बागेची आठवण झाली. मग खाऊ पटकन संपवून रिया बागेत पळाली. केळीचा मोठ्ठा घड लागला होता. पेरूच्या झाडाला खूप पेरू लागले होते. मागच्या बागेत लिंबानी झाड लगडले होते. 

रिया बागेतून घरात गेली तर ममा बाहेर निघाली होती. रियाला जवळ घेऊन ममा म्हणाली, "रिया मी सवाईला जातेय. इतका वेळ गाणे ऐकायचा तुला कंटाळा येईल ना, म्हणून तू घरी आजीबरोबरच थांब" शहाण्या रियाने मान हलवली आणि ममाला अच्छा केला. 

आजी किचनमध्ये काहीतरी करत होती. रियाने हळूच handbag उचलली आणि बागेतल्या झोपाळ्यावर बसली. ढगुल्याला म्हणाली, "आलो आपण इंडियाला आणि पुण्यालासुध्दा. इथेच आजी म्हणत होती, ह्या वर्षी कमी पाऊस पडला म्हणून. आता तू न घाबरता वर जा आणि पाउस पाड. हे बघ, मी पण पहिल्यांदा स्विमिंगला गेले तेव्हा खूप घाबरले होते. पण मग हिंम्मत करून पूलमध्ये उतरले आणि इतके छान वाटले म्हणून सांगू. तूही घाबरू नको. मस्तपैकी आकाशात जा आणि पाउस पाड. पण नंतर परत कसा येशील? घर सापडेल ना तुला?" ढगुला म्हणाला, " नॉट टू वरी ला, मी बरोब्बर घर शोधेन आणि हळूच खिडकीतून तुझ्या handbagमध्ये जाऊन बसेन. "

"ओ. के. बेस्ट ऑफ लक" रिया हसत म्हणाली. ढगुला तिला अच्छा करून, आकाशात वर वर जात दिसेनासा झाला. मान दुखेपर्यंत रिया आकाशात बघत होती. 

आजी तिला म्हणाली, "चल जरा कोपऱ्यावरच्या बागेत जाउन येऊ या. माझेही चालणे होईल आणि तुलाही कंटाळा येणार नाही. त्या दोघी चालत चालत बागेत पोचल्या. वाटेत आजीला तिने विचारले, "आजी एखाद्या वर्षी पाउस कमी पडला तर काय होते?" आजी म्हणाली, "अग शेतातल्या पिकांची वाढ होणार नाही. मग शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत आणि आपल्याला खायला धान्य. " रियाला वाईट वाटले. आकाशात तिने ढगुल्याला शोधले, तर तो कुठे दिसतच नव्हता. खूप उंच गेला असणार बहुतेक. "ढगुल्या खूप पाउस पाड रे इथे. शेतात खूप धान्य पिकू दे"

बागेत रिया घसरगुंडीवर खेळत होती तर पाउस यायला सुरुवात झाली. आजी चकितच झाली. पण रिया मात्र हसत होती. अखेर ढगुल्याला आला तर पाउस पाडता! घरी भिजत येताना रिया खुश होती. आजीने तिचे केस पुसून कपडे बदलून दिले आणि गरम दुध प्यायला दिले. 

इतक्यात ममापण घरी आली. सवाई महोत्सव पावसामुळे रद्द झाला होता. ममा जवळपास रडतच आजीला सांगत होती, "बघ न आई, मी माझ्या मीटींग्ज आधी घेऊन, एवढी सवाईसाठी आले आणि ह्या पावसाने सगळा गोंधळ केला. " आजी म्हणाली, "अग, सगळ्या गोष्टी आपल्या हातात कुठे असतात? सवाई गंधर्व महोत्सव रद्द झाला हे वाईटच झाले. पण तू आणि रिया मला भेटलात ह्याचा आनंद आहेच ना आपल्यापाशी. तोच साजरा करायचा आणि निराशा विसरायची. " 

आपल्या पावसामुळे ममाचा प्रोग्राम चुकला म्हणून रियाला वाईट वाटले, पण शेतात खूप धान्य येणार आहे हे चांगले झाले, अशी तिने मनाची समजूत काढली. पाउस थांबताच बागेत गेली तर पेरू आणि लिंबे खाली पडलेली. रिया खुश होऊन ते वेचू लागली पण केळीच्या झाडाजवळ जाताच तिला रडूच आले. पावसाने केळीचे झाड खाली पडले होते. इवली इवली केळी मातीत पडली होती. 

रिया रडतच आत गेली. "आजी आजी बघ ना आपले केळीचे झाड पडले ग." "अग होना. ह्या अवेळी पावसामूळेच. आत्ता बातम्यात पण पिकांचे कसे नुकसान झाले आहे तेच सांगत होते. " रियाला जोरात रडू यायला लागले. आपण फ़्रोझनच्या 'आना' ऐवजी 'एल्सा' झालो आहोत आणि तिच्यामुळे जसा सगळीकडे बर्फ झाला होता तसा आपल्यामुळे पाउस पडला आहे असे तिला वाटू लागले. 

आजीने विचारताच रियाने तिला ढगुल्याची हकीकत सांगितली. ममा तर 'अगेन युवर स्टोरीज, असा काय ढग आणता येतो का?" म्हणत हसायलाच लागली. रियाला ममाचा फार राग आला. पण आजी मात्र हसली नाही. ती म्हणाली, "अग बाळा, तुला शेतात धान्य पिकायला हवे असे वाटले आणि म्हणून इथे पाउस पाडायला ढग घेऊन आलीस ते छानच केलेस. पण असा कधीही पाउस पडून चालत नाही ग. जी ती गोष्ट, ज्या त्या वेळी झाली तरच उपयोग असतो तिचा. आता ह्या पावसाने फायद्याच्या ऐवजी नुकसानच झाले. पण तुझा हेतू मात्र खूप चांगला होता. खरेच शहाणी मुलगी आहेस तू" तिला जवळ घेऊन आजी म्हणाली, " हे सगळे तुझ्यामुळे झाले म्हणून वाईट नको वाटून घेउ. आपल्याला वाटते आपण कारण आहोत म्हणून, पण खरे तसे नसते. आपल्या हातात काहीच नसते ग. काय, कसे, घडणार हे आधीच ठरलेले असते. पण हे आपण आपल्या हातून काही चांगले घडेल तेव्हादेखील लक्षात ठेवायला हवे. म्हणजे मग माणसाला आपण हे केले, मी किती हुशार असा गर्व होत नाही. तेच तर नेमके माणसाला जमत नाही". आजी सुस्कारा सोडून गप्प झाली. 

खरे तर रियाला फार काही कळले नव्हते, पण आपले खूप चुकले आहे, असे आजीला वाटत नाहीये एवढे मात्र कळले. ती आत गेली. ढगुल्याची आठवण येउन तिने आपल्या bagवरून हात फिरवला तर काय, हाताला काहीतरी लागले. bag मध्ये ढगुला होता!!!

रिया खुश झाली. "कधी आलास तू? आणि हे काय तेवढाच आहेस? तू म्हणाला होतास ना पाउस पडला कि तू हलका होणार आहेस म्हणून?" अग मी पाडलाच नाही पाउस. मी वर गेलो ना आकाशात तर एक ढग आजोबा भेटले. ते म्हणाले, "कोण रे तू? नवा दिसतोयस" मग मी त्यांना सांगितले. "मी सिंगापूरहून आलो आहे, इथे पाउस पाडायला". तर ते म्हणाले, "बाळा एवढा प्रवास करून आलास ते बरे केलेस. पण असे बघ, कितीही प्रवास केला, देश विदेश फिरलो तरी आपले मूळ गाव कोणी विसरते का? तुझ्यासाठी सिंगापूरला पाउस पाडणेच ठरलेले आहे. तू इथल्या आकाशात हवा तेवढा फिर, पण पाउस मात्र तुझ्या गावाला जाउन पाड. तेव्हा मात्र पाउस पाडायला घाबरू नकोस" मग काय मी थोडा वेळ आकाशात फिरलो आणि मग हळूच घरी येउन bag मध्ये जाउन बसलो. 

रियाला एकदम हलके वाटले. पिकांचे नुकसान झाले हे वाईट झालेच पण त्याला आपण जबाबदार नाही आहोत हे किती चांगले झाले. तिने तिचे आवडते फ्रोझनचे गाणे म्हणायला सुरुवात केली, "लेट इट गो, लेट इट गो" !!

ह्या वर्षी वाढदिवसाची पार्टी न करता शेतकऱ्यांच्या मुलांना मदत पाठवायचे तिने ठरवून पण टाकले. 

No comments:

Post a Comment

महाशिवरात्र - २०२६

 महाशिवरात्र - २०२६  जाणीवसमृद्ध भावगर्भ काव्य लिहिणारी माझी मैत्रीण सई लेले हिने सकाळी तिने लिहिलेली शिवस्तुती पाठवली. मनात उतरत जाणाऱ्या, ...