आम्रयोग
पूर्वस्थिती- आंबे शक्यतो दुसऱ्या एखाद्या खोलीत ठेवावे. तिथे जावे, त्यातला चांगला सगळ्यात मोठा तेजस्वी आंबा निवडून घ्यावा. स्वैपाकघरात येऊन तो स्वच्छ धुवावा. मग हातपुसण्याने तो कोरडा करून घ्यावा. ताट किंवा ताटली घ्यावी. एक चमचा घ्यावा. एवढे कार्य स्वैपाकघरातले पूर्ण केल्यावर बाहेर डायनिंग टेबल शी यावे. खुर्ची ओढावी. ताटली, त्यात आंबा, शेजारी चमचा असे टेबलवर ठेवावे.
आसन स्थिती- खुर्चीत सुखासनात बसावे, डोळे मिटून एक दीर्घ श्वास घ्यावा आणि आंबा हातात घेऊन त्याचा स्पर्श, रंग, गंध ह्यांचा आनंद घ्यावा. श्वास हळूच सोडावा. मग खांदा सरळ, हात कोपरात 90 अंशात वाकलेला. उजव्या हाताची अंगठा आणि तर्जनी जवळ आणावी आणि आंबा सोलायला सुरुवात करावी.
दृष्टी आणि मन पूर्णपणे एकाग्र करायचे आहे. आंब्याच्या रसाचा एकही थेंब ताटलीत पडू द्यायचा नाहीये.
कोणत्याही प्रकारे घाई करायची नाहीये. आता आंबा पूर्ण सोलून झाला असेल. उजव्या हातात चमचा, डाव्या हातात सोललेला आंबा अशी आसन स्थिती असेल.
आता चमचा हळूच आंब्याला टेकवायचा आहे. पुढून मागे असा चमचा आंब्यात रोवून एक टवका काढायचा आहे.
मनगटावर कसा ताण येतो, कोणत्या स्नायूंचा वापर होतो ह्याकडे लक्ष द्यायचे आहे.
मनातले विचार आता थांबलेले असतील. लक्ष पूर्णपणे आंब्याकडे लागलेले असेल. अशा स्थितीत तो चमचा सावकाश तोंडात घालायचा आहे.
चमचा आंब्याच्या टवक्यासह तोंडात घालायचा आहे. कोणताही झटका नाही. अगदी सहजपणे ही हालचाल झाली पाहिजे.
आता आंब्याचा गंध आणि चव ह्याचा आनंद घ्यायचा आहे. डोळे उघडे ठेवायचे. दुसरे कोणी आपण सोललेला आंबा खात नाहीये ह्या कडे लक्ष असले पाहिजे.
आंबा किंवा आंबे संपेपर्यंत हे आसन नियमितपणे करायचे आहे.
फायदे- चेहऱ्यावर एक चमक येते. मनात उत्साह ओसंडून व्हायला लागतो. नैराश्य आपल्यापासून दूर राहते.
- वृंदा टिळक
No comments:
Post a Comment